लेखिका- पूजा खाडे पाठक.

झोपेत जोरात अमित चा हात भिंतीवर आपटला आणि तो खाडकन जागा झाला. श्वासोच्छवास जोरात सुरु होता.. कसलीतरी बेचैनी भरून राहिली होती मनात..
हल्ली हे रोजचंच होतं.. रोज विचित्र स्वप्न. कधी गाडी सुटलीये. कधी परीक्षा चुकलीये. कधी चुकीच्या बोर्डिंग गेट ला गेलो आणि फ्लाईट चुकली.
थोड्या वेळाने त्याला स्वप्न आठवलं. अगदी लक्ख. काहीतरी हरवलं होतं. काय ते आठवत नव्हतं पण तो अगदी ते जिवाच्या आकांताने शोधत होता.
सापडेना तेव्हा वैतागून त्याने झोपेत जोरात हात फिरवला आणि हात भिंतीला आपटून त्याची झोपमोड झाली .. विचार करता करता अगदी पहाटे त्याला झोप लागली.
सकाळी नेहमीप्रमाणे आवरून तो ऑफिस ला गेला. जेवायची वेळ झाली तसे त्याने घड्याळ बघितले. “तिकडे आत्ता १० वाजून गेले असतील.” तो मनात म्हणाला. “करावा का फोन .. ?” त्याला क्षणभर वाटलं पण त्याने तो विचार झटकून टाकला.

सलग ४ वर्षे तो घरी गेला नव्हता. अगदी लहान असल्यापासून तो हॉस्टेल ला होता. वडील फार कडक तर आई फार नरम म्हणून त्याला हॉस्टेल ला ठेवायचा निर्णय त्याच्या आर्मीत असणाऱ्या आजोबांनी घेतला होता .. नंतर तोच त्याच्या व्यापात इतका गुंतून गेला कि त्याला घराची आठवण च येईनाशी झाली.
इतक्यात त्याचा फोन वाजला. “काय रे, महिना झाला फोन केला नाहीस आणि केला तर उचलत नाहीस.. ” आई तक्रारीच्या सुरात म्हणाली.
“काम खूप आहे ग आई. घरी सगळं ठीक आहे ना?” त्याने विचारले.
“तसं ठीकच आहे. बाबांची अँजियोप्लास्टी झाली १० दिवसांपूर्वी.” आई म्हणाली.
“काय ?? अगं कळवायचं ना मग?? मेसेज करून ठेवायचा?? काय गं तू आई??” तो म्हणाला.
“अरे त्याने काय होणार? तेवढ्यासाठी तुला कशाला बोलवायचं? झालं सगळं व्यवस्थित.. पण.. तू येऊन जा जरा .. किती वर्ष झाली आला नाहीस .. इतकं कसलं रे काम असतं ?” आई म्हणाली ..
“ठीक आहे, बघतो यंदा .. ” तो म्हणाला. त्याच्या मनानं उचल खाल्ली. विचार बदलायच्या आतच त्याने तिकीट हि बुक केलं. का कोण जाणे पण त्याला बऱ्याच वर्षांनी घरी जायची ओढ लागली होती ..
अगदी एअरपोर्ट पासून त्याच्या घरापर्यंत सगळंच खूप बदललं होतं, माणसंही! बाबा खूप थकले होते, आणि आई अगदी वयस्कर दिसायला लागली होती. त्याला अगदी अपराध्यासारखे वाटू लागले.
१-२ दिवस आराम करून झाल्यावर तो सहज म्हणून सोसायटी च्या आवारात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडला ..
काही गोष्टी मात्र जश्याच्या तश्या होत्या! काही दुकानं, नाका, बस स्टॉप, जिन्याजवळची लपायची जागा, जांभळाचं झाड!
त्याच तंद्रीत तो घराजवळ आला आणि तोच ओळखीचा गंध! तो भारावल्यासारखा घरात शिरला ..
सकाळचे अकरा – साडेअकरा वाजत आले होते.. हॉल मध्ये तीच विशिष्ट उदबत्ती आणि अष्टगंधाचा सुवास, आणि त्यात स्वयंपाकघरातल्या कुकरच्या शिट्टीतून वरण-भाताचा गंध मिसळलेला..
सुबक आवरलेला हॉल, तिथेच कोपऱ्यात शिवमहिमन स्तोत्र म्हणणारी आई. अगदी हवंहवंसं वाटत होतं त्याला ते सगळं.. खूप जवळचं ! आश्वासक!
नकळत तोही स्तोत्र म्हणायला लागला. लहानपणी अगदी तोंडपाठ होतं त्याचं ते स्तोत्र! म्हणून झालं तोपर्यंत बाबा बाहेर येऊन बसले होते.
“चला, पोळ्या करते मग पानं घेऊ .. ” आई उठत म्हणाली ..
“नको आई – आज फक्त वरण – भात दे मला .. आणि सोबत तूप लिंबू .. आणि हो, लहानपणी द्यायचीस तसा कालवून दे!” तो म्हणाला.
“आणते!” म्हणत आई खुश होऊन स्वयंपाक घरात गेली ..
“लिंबाचं लोणचं केलंय ते वाढ गं त्याला .. आवडतं त्याला .. ” त्याच्याकडे न बघताच बाबा म्हणाले ..
त्याच्यासाठी हा सुखद धक्का होता! आई अगदी कौतुकाने त्याच्यासाठी वरण भात घेऊन आली. “भरवू का रे? चालेल का?” तिने चाचरत विचारले..
“हो भरव कि .. ” तो म्हणाला ..
कित्येक वर्षात इतक्या प्रेमाने तो घरातल्यांशी बोललाच नव्हता! आईच्या हातून त्याने एक घास खाल्ला आणि.. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले!
त्या संध्याकाळी सगळे बागेत फिरायला गेले .. लहानपणी तो मध्ये असायचा आणि आई बाबा त्याचा हात धरायचे.. यावेळीही तोच मध्ये होता, पण त्याने आई बाबांचा हात धरला होता!
छानपैकी भेळ खाऊन सगळे घरी आले. आईने खिचडी आणि भजीचा बेत केला.. रात्री पत्त्यांचा डाव रंगला! आईने छान डोक्याला मालिश करून दिली, आणि अमित झोपायला त्याच्या खोलीत गेला ..
रात्री परत तेच स्वप्न .. पण यावेळी स्वप्नात त्याने गाडी पकडली होती.. आणि ती त्याला थेट त्याच्या घरी घेऊन आली होती.. हातातून निसटून जाणारं “घर” त्याला परत मिळालं होतं!
©️पूजा खाडे पाठक.
(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here