गेल्या ३ महिन्यांपासून देशात कोरोनाचा फैलाव सुरू आहे. आजघडीला देशात २ लाख ६६ हजारांहून जास्त कोरोना रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन तब्बल अडीच महिन्यांनंतर काही प्रमाणात शिथिल करण्यात आला. मात्र, या दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आता केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयाने सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक अर्थतज्ज्ञांनी भाकित केल्याप्रमाणेच देशात आता महागाई वाढायला सुरुवात झाली आहे. त्याचा श्रीगणेशा पेट्रोल-डिझेलपासून करण्यात आला असून आज सलग तिसऱ्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

देशात अनलॉक १ सुरू होऊन अगदी काही दिवसच झाले आहेत. नागरिक घरात होते, तोपर्यंत पेट्रोलचे दर नियंत्रणात होते. मात्र, आता नागरिक जसे घराबाहेर पडले, तसे पेट्रोलचे दर देखील वाढू लागल्यामुळे लोकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी ६० पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा या दोन्हींच्या दरांमध्ये प्रत्येकी ६० पैशांची वाढ करण्यात आली. आणि आता आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५४ पैसे आणि ५८ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेट्रोलचा दर ७३ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७१.१७ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

एकीकडे अनेक कर्मचारी कपात, पगार कपात किंवा सक्तीची बिनपगारी रजा या कारणांमुळे लोकांची आर्थिक स्थिती कमालीची घसरलेली असताना आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांचं आर्थिक गणित अजूनच कोलमडण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते पुढच्या ६ महिन्यांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here