नवरात्रीनिमित्त रंगणाऱ्या स्पर्धा यंदा ऑनलाइन

0
3

नवरात्रोत्सव यंदा करोनामुळे एकत्रित येऊन साजरा करता येणार नसल्याची खंत आहे.

करोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्याने ठाण्यातील मंडळांचा निर्णय

ठाणे : दरवर्षी नवरात्रीनिमित्ताने शहरातील मैदानात महिलांसाठी रंगणाऱ्या स्पर्धांवर यंदा करोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांनी या स्पर्धा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पद्धतीने समाजमाध्यमांवर रंगणाऱ्या स्पर्धांमध्ये महिलांना यंदा घरातूनच त्यांचे कलागुण सादर करता येणार आहेत.

नवरात्रीच्या काळात महिलांसाठी दरवर्षी गरबा, संगीत खुर्ची, नृत्य स्पर्धा, आरती स्पर्धा अशा विविध स्पर्धा सार्वजानिक उत्सव मंडळांतर्फे घेण्यात येतात. त्यामध्ये महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र, यंदा करोनाचे सावट असल्यामुळे सार्वजानिक नवरात्र उत्सव साजरा करण्यावर अनेक बंधने आहेत. तसेच अनेक मंडळांनी त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केले आहेत. मात्र नवरात्रीच्या उत्साहात खंड पडू नये, यासाठी ठाण्यातील मंडळांनी महिलांसाठी ऑनलाइन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये गरबा नृत्य स्पर्धा, केशभूषा स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, देवीची आरती स्पर्धा, स्वयंपाक स्पर्धा, मेकअप स्पर्धा या सर्व स्पर्धा ऑनलाइनद्वारे होणार आहेत. या स्पर्धांमध्ये छायाचित्र किंवा चित्रफीत काढून सहभागी होता येणार आहे.

नवरात्रोत्सव यंदा करोनामुळे एकत्रित येऊन साजरा करता येणार नसल्याची खंत आहे. परंतु नवरात्रीनिमित्त संस्थेतर्फे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हे कार्यक्रम संस्थेच्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्यात येणार आहेत, असे ‘ब्रह्मांड कट्टा’चे राजेश जाधव यांनी सांगितले.

दरवर्षी कळवा येथे देवीची स्थापना करून समोरच्या मैदानात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धा घेण्यात येतात. मात्र, यंदा करोनाचे संकट ओढवल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे कळवा ब्राह्मण सभा मंडळाने यंदा समाजमाध्यमाचा आधार घेत ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. – संदीप खांबेटे, कळवा ब्राह्मण सभा

घंटाळी येथील मंदिरात दरवर्षी देवीच्या मूर्तीची स्थापना करून नऊ दिवस विविध उपक्रम आयोजित केले जातात. करोनामुळे मंडळाच्या या पंरपरेला खंड पडू नये म्हणून यंदा विविध उपक्रम आणि स्पर्धा ऑनलाइन आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणीही सुरू झाली असून स्पर्धक मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धा मंडळाच्या फेसबुक पेजवर प्रसारित होणार  आहेत.  –  गीत नाईक, संचालक, हिंदू जागृती सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here