लेखक – मोहन जोशी.

आमचा नवीन संसार सुरळीत सुरू झाला. आमची दोघांची पहिली ट्रिप देवदर्शनासाठी रांजणगावला गणेश दर्शनाने झाली.
त्यावेळी कुणीतरी सांगितलं हैद्राबाद ला बघण्यासारखे खूप आहे. मग आम्ही आईची परवानगी घेऊन बसची जाण्या-येण्याची तिकिटे बुक केली व पुरेसे पैसे घेऊन हैद्राबाद ला निघालो.
नव्या- नवलाईचे दिवस असल्याने प्रत्येक बाबतीचे अप्रूप वाटत होतं. एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि हैद्राबाद शहरात दोन दिवस मनसोक्त भटकंती केली.
परतताना जेवणासाठी बस अर्धा तास थांबणार होती. या हैद्राबाद ट्रिप साठी एक लेदरचं पाकीट मी मुद्दामहून खरेदी केलं होते व त्यात आमचे जवळचे पैसे ठेवले होते.
आता जेवणासाठी पैसे लागतील म्हणून या पाकिटासाठी पँटच्या खिशात हात घातला, तर काय, तिथं पाकीट नव्हतं !
मला घामच फुटला. धडपड करत-करत, पुन्हा-पुन्हा मी खिशात हात घालत राहिलो. माझा जीव अगदी घाबरा-घुबरा झाला.
माझी ही धडपड, माझी पत्नी ज्योती पाहात होती. ती म्हणाली,” काय शोधतोयस मघा पासून ?”
“अगं, माझं पाकीट सापडत नाहीय. मी पँटच्या खिशातच ठेवलं होतं.” माझं पाकीट हरवलं होतं आणि पैसेही !
“पैसेही गेले ?”
“हो !”
“पण मोहन ! पुण्यात पोहोचायला अजून खूप वेळ आहे. आपल्याकडे खायला पण काही नाही. ग्लुकोज बिस्किटांचा एक छोटा पुडा तेवढा पिशवीत आहे.”
“चल जाऊ दे. दोन-दोन बिस्किटे खाऊ आणि पाणी पिऊ !”
बस जेवणासाठी थांबली. आमची पुढची सीट होती. आम्ही सीटखाली, इकडे-तिकडे पाकीट शोधत राहिलो आणि नंतर हताश होऊन बसमध्येच बसून राहिलो.
मागचे सर्व प्रवासी जेवणा करिता भराभरा खाली उतरू लागले. उतरणाऱ्या त्या प्रवाशांकडे व खिडकीतून दिसणाऱ्या हॉटेलकडे आम्ही नुसते बघत राहिलो.
बसमधून उतरणाऱ्या एका माणसाने आम्हांला पाहून विचारले, “तुम्ही जेवणा करता उतरत नाही काय ?”
आता काय सांगावे, कसं सांगावं ते मला कळेना. मग मी खरं-खर सांगायचं ठरवलं आणि म्हणालो, “नाही. माझ्याकडे पैसे नाहीत ! माझं पाकीट कुठंतरी हरवले, त्यातच सगळे पैसे होते.”
ते गृहस्थ म्हणाले,” मग तुम्ही जेवणार नाही ?”
“नाही, घरी जाऊनच जेवू.”
“असं कसं, पुणे यायला तर अजून चिक्कार वेळ आहे.”
“काय करणार ? आमचं पाकिटच हरवलंय ना ?”
ते म्हणाले, “तुम्ही दोघे मघापासून पाकीटच शोधत होतात का ? मी बघत होतो ! तुम्ही असं करा, आमच्याबरोबर जेवायला चला.”
आम्ही आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहात राहिलो.
आमची यांची ओळख नाही, पाळख नाही, तरी हा माणूस चक्क आम्हांला स्वतःबरोबर जेवायला यायचा आग्रह करतोय !” ते गृहस्थ आमच्या उत्तराची वाट पाहात उभे राहिले.
आम्ही अगदी अवघडून गेलो.
संकोच वाटून मी म्हणालो, “नको. थँक्स !”
ते म्हणाले,” संकोच करू नका.”
आम्ही एकमेकांकडे पाहात राहिलो. काय निर्णय घ्यावा ते आम्हांला कळेना. त्यांचा आग्रह मोडवेना व आमचा संकोचही जाईना. पण आम्हाला भूक तर प्रचंड लागली होती.
आम्ही काहीच बोलत नाही, हे पाहून, ते म्हणाले, “संकोच वाटणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येते माणसावर कधी-कधी. तेव्हा फार विचार करीत बसू नका. चला आमच्याबरोबर !”
त्यांचा तो प्रांजळ, निर्मळ आग्रह आम्हांला मोडवेना. आम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर हॉटेलात गेलो.
त्यांनी विचारले,” काय
जेवणार ?”
मी म्हटलं, “तुम्ही मागवाल ते.”
जेवण आलं. आम्ही दोघे जेवलो. घराबाहेर असताना, खिशात पैसे नसतांना आणि भूक लागलेली असतांना अन्न मिळणं म्हणजे काय असतं, याचा मी प्रथमच अनुभव घेतला.
जेवून आम्ही बसमध्ये येऊन बसलो. मी त्यांना म्हटलो, “सर, तुमचा पत्ता सांगा मला. आम्ही स्वतः पैसे आणून देतो.”
ते म्हणाले, “त्याची काय जरूर आहे. असे किंती पैसे झाले जेवणाचे ?”
“नाही असं नाही. प्रश्न पैश्यांचा नाहीय. आमच्याकडे जेवणाचे पैसे नसताना आम्हाला तुम्ही आपणहून जेवायला नेणं, ही फार मोठी गोष्ट आहे.”
त्या गृहस्थांचे नाव ‘काळे’. ते सहकारनगर ला राहात होते. पुण्याला पोहोचल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी मिठाई घेतली, पैसे घेतले आणि काळे यांचा पत्ता हुडकत त्यांच्या घरी गेलो. त्यांना मिठाई दिली, पैसे दिले व त्यांचे पुन्हा-पुन्हा आभार मानले.
त्यानंतर त्या अन्नदात्याची आणि माझी परत कधीच गाठ पडली नाही. पण इतकी वर्षे होऊनही तो प्रसंग आणि काळे नावाच्या त्या सद्गृहस्थांना आम्ही कधीच विसरलो नाही !
या घटनेला ४०-५० वर्षें झाली. त्यावेळच्या हवेतच कदाचित माणुसकी होती !
©मोहन जोशी.
(नाट्य-चित्र अभिनेते मोहन जोशी यांच्या ‘नट-खट’ या आत्मचरित्रातून निवडलेला एक हृद्य प्रसंग – साभार )
(आवडल्यास शेअर करतांना कथेत कोणताही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here