जागतिक आरोग्य संघटनेने करोना हा HIV प्रमाणे जमिनीवरच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत तरी करोना काही आपल्याला सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसचा वाहक माणूस असल्याने करोनाच्या या अस्तित्वाचा थेट परिणाम नातेसंबंधांबरोबरच आपल्या दैनंदिन जीवनापासून आपल्या सामाजिक आयुष्यावरही होत आहे व होणार आहे. यामुळे माणस आधीसारखी माणसामध्ये मिसळण्याची शक्यता कमी झाली असून माणसा माणसात अंतर येऊन दुरावेच वाढणार, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बर्‍या वाईट घटना घडतात. यातील कमी महत्त्वाच्या घटना कालानुरुप विस्मरणात जातात. तर यातील काही घटना मनावर खोल व्रण करून जातात. ज्या विसरणे शक्यच नसतं. त्यांचा आयुष्यावर दूरगामी परिणाम झालेला असतो. परिणामी या घटनांशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तूच्या आपण एकतर खूप जवळ जातो अथवा त्यांच्यापासून कायमचे दूर राहणेच पसंत करतो. सध्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कहर करणार्‍या करोनाचेही आपल्या आयुष्यावर असेच दूरगामी परिणाम होणार असल्याचं मत जगभरातील तज्ज्ञमंडळी व्यक्त करत आहेत.

त्याच कारणही तसंच आहे. कारण याआधी जगभरात अनेक नैसर्गिक व मानव निर्मित संकट आली. त्यात मग यु्दध, त्सुनामी असो, पूर, भूकंपाबरोबरच, सार्स, इबोला, इन्फ्लुएन्जा, स्वाईन फ्लू अशा आजारांचीही संकटे आली. पण त्यात एका देशाने दुसर्‍या देशाला मदतीचा हात देऊन त्यांना त्यातून बाहेरही काढलं. यामुळे तो देशच नाही तर तेथील माणसांनाही मानसिक आधार वाटला व ते पुन्हा हिंमत करत स्थिरावले. म्हणूनच माणसं माणसांच्या कामी कशी आली याची चर्चा आजही होते. पण करोनाचे तसे नाहीये. इथे माणसं माणसांना करोना देत व देणार असल्याने येत्या काळात माणसांमध्ये जीवाच्या भीतीने का होईना दुरावा येणार हे नक्की. एकदा का सहवास व संपर्कात दुरावा आला कि ती नातीही मग कमी महत्वाची वाटायला लागतात. त्यांच्याविना जगण्याची आपल्याला सवय होते असंच काहीस चित्र करोनाचा प्रभाव कमी झालेल्या देशांमध्ये पाहायला मिळत आहे.

त्यातच नुकतचं जागतिक आरोग्य संघटनेने करोना हा HIV प्रमाणे जमिनीवरच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत तरी करोना काही आपल्याला सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हायरसचा वाहक माणूस असल्याने करोनाच्या या अस्तित्वाचा थेट परिणाम नातेसंबंधांबरोबरच आपल्या दैनंदिन जीवनापासून आपल्या सामाजिक आयुष्यावरही होत आहे व होणार आहे. यामुळे माणस आधीसारखी माणसामध्ये मिसळण्याची शक्यता कमी झाली असून माणसा माणसात अंतर येऊन दुरावेच वाढणार असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. आधी जी माणसं सुखदुख साजऱी करण्यासाठी एकत्र येत होती. ती आता एकमेकांपासून दोन हात लांब राहणार आहेत. हस्तांदोलन किंवा मिठ्या मारत एकमेकांप्रती प्रेम व आदर व्यक्त करणे बंद झालंच असून येत्या काळात केवळ लांबूनच हाय हॅलो केले जाणार आहेत. हे अंतर शारीरिक असले तरी त्याचा परिणाम मानसिकतेवरही होईल. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकटेपणापेक्षा तो समूहात अधिक रमतो. पण करोनाने त्याला माणूसघाणा होण्यासाठी तयार केलं आहे. यामुळे येणारा काळ हा स्वार्थ व नि:स्वार्थ यापलिकडचा असून जगण्याची ही लढाई ज्याला त्याला एकट्यानेच लढावी लागणार आहे. यात जो काळानुरुप बदल स्विकारेल तो टिकणार यात शंकाच नाही. मात्र बाकीच्यांना स्वत: मध्ये काही बदल करण्याशिवाय पर्याय नाही.

हे बदल भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशातही जाणवणार आहेत. करोना लवकर जाणार नसल्याने मुलांच्या शाळा आता घरातच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भरणार आहेत. क्लासेस तर सुरूच झाले आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली वर्क फ्रॉम होमची सोय काही कंपन्या अजून काही महिने लांबवण्याची शक्यता आहे. यामुळे ऑफिस व शाळा घरातच भरणार असल्याने घरातल्या कटकटींबरोबर पती पत्नीला वर्क प्रेशरही हँडल करावं लागणार आहे. त्यात मुलांची ही ऑनलाईन शाळा नॉर्मल शाळेप्रमाणेच भरणार असल्याने मुलांना मधली सुट्टी घरातच एन्जॉय करता येणार आहे. त्याची आई बाबांनाही सवय करावी लागणार आहे. मॉल तर बंदच राहणार आहेत. चित्रपटही ऑनलाईन प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असल्याने महिन्यात एकदा कुटुंब किंवा मित्रमंडळीबरोबर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्याचा आनंदही हिरावला जाणार आहे. तेच चित्रपट आता घरातील हॉलमध्ये बसून बघावे लागणार आहेत. आपल्यासाठी हा अनुभव नवीन आहे. पण यामुळे आपला व मुलांचा बाहेरच्या जगाशी होणारा जनसंपर्कही आपोआप कमी होणार हे देखील स्पष्टच आहे. परिणामी करोनानंतरचे आपलं सोशल लाईफ पूर्णपणे बदललेलं असेल.

याबाबतीत बोलायचं झालं तर ज्या देशांमध्ये सोशल लाईफ कमी आहे अशा इस्लामी राष्ट्रांना असं जगणं फार कठिण नाहीये. अफगाणिस्तान व सौदी अरेबियात आजही अनेक कुटुंब मोकळेपणे बाहेर भटकण्यापेक्षा घरात राहणेच पसंत करतात. त्यांनी आपल्या अवती भोवती तशी चौकटच निर्माण केली आहे. यामुळे करोनाचे आफ्टर इफेक्टसचा त्यांच्यावर फारसा परिणा होणार नाहीये.
पण भारतासारख्या देशावर याचे दूरगामी परिणाम होण्याचीच शक्यता आहे. लोकांना भेटणे बोलणं, एकत्रित सणवार साजरे करणे, सुखदुखात सहभागी होणे ही आपली परंपरा आहे. पण करोनामुळे त्याला चाप बसणार असून या घुसमटीची आपल्याल सवय करावी लागणार आहे. यामुळे येणारे दिवस हे करोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी असणार आहेत. ते सोशल नसून डिजीटल असतील. लग्न, मुंज, बारसे आता थोडक्यात आटोपली जातील. ज्यांना आग्रहाने बोलवायचे नसेल त्यांना डिजिटलवर या कार्यक्रमात सहभागी केले जाईल. तर गेलेल्याला निरोप देण्यासाठी स्मशानात नाही तर मोबाईल समोर गर्दी होताना दिसेल. याचे सगळे श्रेय करोनालाच यात शंकाच नाही.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here