जेव्हा एखादं मूल टोकाचा निर्णय घेतं, आत्महत्या करतं तेव्हा वास्तवात इतर अनेक मुलं त्या खोल निराशेच्या अवस्थेतून जात असतात

डॉ. मोहन देस

mohandeshpande.aabha@gmail.com

शिक्षण व्यवस्थेमधून निर्माण होणाऱ्या कोणत्याही एका समस्येवर आणि तिच्यावरील उत्तराचा विचार करायला सुरुवात केली की एका प्रश्नावर गाडी येऊन थांबते. तो म्हणजे शिक्षणाचा हेतू काय?[quads id=1]

जर शिक्षणाचा हेतू सर्वागीण क्षमता निर्माण करण्याचा आणि मुलांना पुढील जीवनासाठी तयार करण्याचा असेल तर शालेय शिक्षण विभागाने परीक्षा निकालातून ‘अनुत्तीर्ण’ हा शेरा पुसून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आणि विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरचा कोणता शिक्का काढायचा आणि कोणता शेरा द्यायचा याचा वेगळा विचार करावा लागेल.

एखाद्या शाळेचा किंवा एखाद्या भौगोलिक विभागाचा एसएससीचा निकाल पंचाऐंशी किंवा त्याहून अधिक टक्के लागला म्हणजे चांगला लागला, असं म्हटलं जातं.

हे सांगताना सांगणाऱ्याचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो, त्याला अगदीच अर्थ नसतो असं नाही.. तरी वास्तवात याचा अर्थ उरलेली मुलं नापास झाली असा असतो. जसं ‘आमच्या वैद्यकीय क्षेत्रात ८७ टक्के लसीकरण झालं आहे.’ असं अभिमानाने जेव्हा सांगितलं जातं तेव्हा

१३ टक्के मुलं त्या जीवघेण्या रोगांच्या खाईत ढकलून दिलेली असतात. त्याचा अर्थ काय असतो हे त्या मुलांना उमजतो असं नाही, पण आपल्याला निश्चित समजायला हवा.

आपल्याकडे दहावी-बारावीच्या महापरीक्षेच्या बऱ्याच आधी काहींना वेचून, निवडून ‘खाली’ ठेवून या परीक्षेत चांगलं यश हमखास मिळवण्याची पूर्वतयारी काही संस्था करत असतात. त्याविषयी कोणाचा फार आक्षेप असतो असं नाही. परंतु अशी मखलाशी करताना आपणच नापास होत असतो हे सत्य आपण झाकून ठेवत असतो. पण हे मुलांनाही कळतं. त्यांच्या असहाय पालकांनाही कळतं. फक्त, ते काही बोलत नाहीत एवढंच. फार कमी वेळा नापास मुलांचा विचार संवेदनशील रीतीने होताना दिसतो. किंबहुना त्यांचा विचार का करायचा असाही प्रश्न काही जणांना पडतो. सर्वसाधारणपणे असंच मानलं जातं की त्यांनी अभ्यास केला नाही, आळस केला, उनाडक्या केल्या म्हणून ती नापास झाली किंवा त्यांची लायकीच नाही, असा एक पूर्वापार समज आहे. त्यांच्यापैकी काही मुलांनी आत्महत्या केली तरच आपण विचारात पडतो. दर वेळी ‘नेमेचि येतो निकाल आत्मनाशी’ असं म्हणून टीव्ही चॅनेल्सवर घमासान चर्चा झडते. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि मानसोपचारतज्ज्ञदेखील त्यात हिरिरीने सहभागी होतात. पण तेव्हा ती घटना होऊन गेलेली असते. ते मूल परत येणार नसतं. बहुतेकदा जाणत्या लोकांच्या या चर्चा, जणू वास्तवातल्या काही गोष्टी अटळ आहेत, त्या बदलता येत नाहीत, किंबहुना ज्या अर्थी इतकी वर्षे ही पास-नापास व्यवस्था अविरत चालू आहे त्या अर्थी ती पासच आहे, असं समजून चाललेल्या असतात.[quads id=2]

काही चांगले लोक ‘नापासांच्या शाळा’ काढतात. त्यांची उमेद वाढवतात, अवघड विषय म्हणजे गणित आणि इंग्रजी सोपे करून सांगतात. हमखास पास होण्याच्या काही युक्त्या सांगतात. हे खूप चांगलं आहे. किमान त्या मुलांची जगण्याची, काही सिद्ध करून दाखवण्याची इच्छा तरी जिवंत रहाते. परंतु असे प्रयत्न स्त्युत्य असले तरीही ते शिक्षणाच्या  कडेकोट व्यवस्थेतून बाहेर पडलेल्या मुलांना पुन्हा त्याच व्यवस्थेत फिट बसवण्यासाठीच असतात. इतके प्रयत्न करूनही त्यातली काही मुलं पुन्हा नापास होऊच शकतात.

नापास होणं ही एक वैयक्तिक घटना असली तरी तिचा जरा व्यापक अर्थ असा असतो की आम्ही एक स्टँडर्ड म्हणजे प्रमाण गुणवत्तेची व्यवस्थित व्यवस्था तयार केली आहे. काही

‘अ-व्यवस्थित’ मुलांना या व्यवस्थेच्या बाहेर ढकलून देणं भाग आहे. ही सारी व्यवस्था टिकून राहण्यासाठी हे आवश्यक आहे. या व्यवस्थेचं आरोग्य (?) नीट राहावं म्हणून ती ‘आटोपशीर’ राहायला हवी. याचा परिणाम त्या मुलांवर काहीही होवो. कितीही घातक होवो. खरं तर पास झालेली मुलं देखील स्वत:ला लकी समजतात कारण परीक्षा ही तशीच असते. म्हणून परीक्षेसाठी लोक शुभेच्छा देत नाहीत ‘बेस्टलक’ म्हणतात. मुलं देखील मारुतीला प्रदक्षिणा घालत पेपर सोप्पा निघू दे देवा, (किंवा फुटू दे) असं मनाशी म्हणतात. क्षमतेचं मूल्यांक न केवळ लकवर किंवा देवाच्या इच्छेवर विसंबून ठेवण्याची वेळ का येत असावी?

आपल्याला या व्यवस्थेची सवय लागून अनेक वर्षे झाली. ती कधी सुरू झाली, तिचा विकास कसा होत गेला, कोणी केला, हा एक मोठा इतिहास आहे. पण हळूहळू ती अधिकाधिक कडेकोट होत गेली. पास-नापास निश्चित कळावं, त्यात उगाच गोंधळ नको म्हणून पास आणि नापासांच्या मध्ये एक रॅंडम पण पक्की सीमा आखली गेली. पस्तीसची सीमा! या सीमेवर अनेक मुलं धारातीर्थी पडली. नापसांच्या अनेक पिढय़ा यात भरडल्या गेल्या.

जेव्हा एखादं मूल टोकाचा निर्णय घेतं, आत्महत्या करतं तेव्हा वास्तवात इतर अनेक मुलं त्या खोल निराशेच्या अवस्थेतून जात असतात, त्या भयाण टोकावरून ती परत फिरतात आणि कशीबशी जिवंत राहतात.  त्यांच्यामुळे ही व्यवस्था अधिक कडेकोट होते. नापास होणाऱ्या मुलांकडे पाहण्याची, म्हणजे अपयश म्हणजे काय हे मोजण्याची एक कडवी नजर व्यवस्थेला होकार देणाऱ्यांनी अनेक पिढय़ांच्या मोठय़ा काळात कमावली आहे. एकूणच अंगवळणी पडलेल्या या व्यवस्थेने ‘यश म्हणजे काय’ याचीही मानसिकता ठरवली आहे. यशाची तीच संकल्पना ठरवून ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ अशी मनापासून फार न पटणारी वाक्यं आपण तयार केली आहेत. त्याने सांत्वन करणाऱ्याचं सांत्वन कदाचित होऊ शकत असेल, ज्याची त्याला गरज नसते. अपयशाच्या पायरीवर राहून राहून शेवटी कंटाळून तीही कायमची सोडून जाणारी मुलं-मुली खूप आहेत. विशेषत: ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातल्या मुली. हुशार असूनही अ‍ॅॅनिमिया, कुपोषण, काबाडकष्ट, घरकाम, न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या आणि लहान वयात लग्न अशा गोष्टींमुळे शिक्षणाबाहेर फेकल्या जाणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय आहे.

अ‍ॅनिमिया म्हणजे लाल रक्तपेशींची कमतरता. म्हणजे हिमोग्लोबिन कमी. म्हणजेच रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी. तो मेंदूपर्यंत देखील नीट पोचत नाही. मुलगी लक्षात काय ठेवणार? लिहिणार तरी काय? अशा मुलींना मी लोहाच्या आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, ज्या सरकारी दवाखान्यात मोफत मिळतात त्या घ्यायला सांगतो. जेवण व्यवस्थित घ्यायला सांगतो. हे केल्यावर त्या काही महिन्यात तरतरीत होतात आणि पास होऊ लागतात,असा अनुभव आहे. मुलीचं घरकाम, भांडी, कपडे, केरवारा, शेतीचं काम कमी करा, मुली पास होतात. काही आदिवासी आश्रमशाळांमध्ये आम्ही खरूज आणि उवांना हद्दपार केलं. त्यानंतर काही मुख्याध्यापकांची आभाराची पत्रे आली. म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुम्ही येऊन गेलात, खरूज गेली. मुलं पास होऊ  लागली.’’ जे हात अंग खाजवण्यात सतत गुंतले होते त्या हातांना शांतता आली, ठहराव आला. ते हात आता निश्चिंतपणे पेपर लिहू लागले. सगळी मुलं मुळात सक्षमच असतात. (अगदी थोडी अपवादात्मक मुलं अशी असतात की त्यांना काही मानसिक, बौद्धिक प्रश्न असतात.) आपण निर्माण केलेल्या  व्यवस्थेतल्या काय काय असंबद्ध गोष्टी त्यांना अक्षम बनवतात याचं भान आपल्याला येत नाही.  शाळा-महाविद्यालयाच्या निकालातून नापासाचा शिक्का काढून टाकावा, असं अनेक वेळा अनेक लोकांनी म्हणून झालं, चर्चा झाल्या, बरंच लिहून झालं आणि त्याच्यावर अलीकडे शिक्कामोर्तब झालं. हे अतिशय चांगलं झालं आहे.

तरी काही प्रश्न

शाळा-महाविद्यालयातील नापास होणारी किंवा अजिबात न चमकणारी काही मुलं पुढं जाऊन जीवनात यशस्वी ठरतात हे आपल्याला ठाऊक आहे. आणि जी मुलं चमकदार गुण कमावतात, ती प्रत्यक्ष जीवनात यश मिळवतातच, असंही दिसत नाही. फार लांब नको जायला. अशी कैक उदाहरणं आणि प्रत्यक्ष अनुभव सांगणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. यश कशाला म्हणायचं याची तात्त्विक चर्चा इथं फार करता येणार नाही. यश म्हणजे साधारणपणे जे मनात येतं तेच सध्या गृहीत धरूया. पण याचा अर्थ असा आहे का, की एकूण औपचारिक शिक्षण, अभ्यासक्रम, विषय, मूल्यमापन पद्धती, पास-नापास याचा प्रत्यक्ष जगण्याशी आणि आयुष्यात काही यश मिळवण्याची साक्षात कार्यकारणभावी संबंध नसतो? या प्रश्नाचं उत्तर ‘हो, असं अनेकदा असतं.’ असं मिळण्याची भीती आणि शक्यता वाटते. आता या पुढे अनुत्तीर्ण हा शेरा कोणाच्या प्रगतीपुस्तकावर बसणार नाही हा निर्णय स्वागतार्ह आहे, असं म्हणताना त्याने शिक्षण आणि जीवनातील यश यातील ही तफावत अधिकच उघडी होते, असं वाटतं.

रूढ मूल्यमापन पद्धती

आताच्या व्यवस्थेत पास-नापास कसं ठरतं हे उमजल्यास या तफावतीचं कारणही कळेल. औपचारिक शिक्षणामध्ये मुलांच्या मूल्यमापनाची सध्याची पद्धत बहुतांशी स्मरणशक्तीशी निगडित आहे. (म्हणूनच ती वाढवण्यासाठी औषध बाजारात अनेक जुन्या, नव्या, खोटय़ा ब्रेनटॉनिक्सचा जोरात खप आहे.) अनेक शिक्षणतज्ज्ञ मंडळींच्या दृष्टीने पुस्तकातल्या गोष्टी लक्षात ठेवून त्या जशाच्या तशा कागदावर उतरवणं ही तशी ज्ञानाशी किंवा क्षमतेशी, दृष्टिकोनाशी किंवा योग्य कृतीशी संबंधित बाब नाही. तरी मूल्यमापनासाठी हाच एक पलू महत्त्वाचा मानला जातो. नको असलं तरी माहिती तंतोतंत लक्षात ठेवणं हाच जणू शिक्षणाचा अंतिम हेतू आहे, असं यात मानलं जातं. मूल्यमापनाची ही सगळ्यात सोप्पी आणि सगळ्यात आळशी म्हणावी अशी पद्धत आहे. म्हणून ती लोकप्रियदेखील आहे.

काही प्रमाणात हीच पद्धत वैद्यकीय महाविद्यालयात देखील वापरली जाते. जिथं याचं खरं तर फार महत्त्वाचं स्थान नाही, तरी. स्मरण पाहिजे पण ते का पाहिजे हेही कळलं पाहिजे. जे स्मरणात ठेवायचं त्याचं पूर्ण किंवा काहीही आकलन झालं नाही तरी चालेल किंवा अर्धवट झालं तरी चालेल, असं या मूल्यांकन पद्धतीमध्ये जणू गृहीत आहे.

या स्मरण संस्कृतीची म्हणजे पाठांतर संस्कृतीची पिढीजात सवय समाजातील काही विशेष वर्गातील मुलांना अधिक असते. ही मुलं परीक्षेत अधिक मार्क मिळवताना दिसतात. अनेक शिक्षणतज्ज्ञ असं सांगतात की आकलन न होता स्मरणात ठेवणं ही एक कृत्रिम आणि त्याहूनही अवघड प्रक्रिया आहे. म्हणून असेल कदाचित की काही नीट आकलन न होता तंतोतंत लक्षात ठेवण्याचा ताण काही मुलांना सहन होत नाही. त्यांच्यासाठी परीक्षा प्रचंड ताणाची ठरते. ही मुलं नापास होतात किंवा त्यांना चांगले गुण मिळत नाहीत. म्हणजे ती अक्षम असतात असे नाही. अर्थात यावर काही वेळा काही प्रमाणात उतारा योजला जातो हे खरं आहे. उदाहरणार्थ, निबंध लेखन किंवा प्रकल्प, शिक्षण सहली किंवा कार्यानुभव. परंतु या सर्वाचं अगदी पाठांतर नाही, पण ‘नवनीती’करण होत असतं. यांचीही ठरीव सूत्रे तयार केली जातात. त्याची सोपी आणि सवंग गाइड्स बाजारात आहेत. ती प्रत्यक्षात वापरलीही जातात. अनौपचारिक आणि सर्जनात्मक शिक्षण देखील यामुळे औपचारिक आणि नीरस होत आहे. अशा रीतीने योजलेला हा चांगला उताराही चक्क नापास होतो.

आणखी काही शेरे

प्रगती पुस्तकावरील अनुत्तीर्ण शेरा पुसला जाणं अगदी योग्यच. पण सरकारने एवढंच केलेलं नाही. तर काही मुलांना ‘फेरपरीक्षेसाठी पात्र’ असा शेरा द्यायला सांगितलं आहे. हे चांगलं झालं. मात्र दोन-तीन विषयात नापास होणाऱ्यांसाठी ‘कौशल्य शिक्षणास पात्र’ असा शेरा द्यावा असं म्हटलं आहे. कौशल्य शिक्षण म्हणजे प्लंबिंग, फर्निचर, हॉस्पिटॅलिटी, इलेक्ट्रिशियन, स्वयंपाक, यंत्र-उपकरण दुरुस्त्या इत्यादी. याचा अर्थ असा आहे का की उत्तीर्ण मुलांना कौशल्य शिक्षणाची गरज नाही आणि सोय आणि समाधानही मिळू नये? शिवाय आधीच कौशल्य शिक्षणाला समाजात प्रतिष्ठा कमी आणि पसाही कमी पण कष्ट कमी नाहीत. परंतु एकूणच श्रमाला प्रतिष्ठा कमी असलेल्या समाजात त्यामुळे घासाघीस करत अगदी चांगल्या, सुबक कामाला देखील मोबदला कमी देण्याची वृत्ती आहे. या प्रस्थापित मानसिकतेत या शेऱ्याने भर तर पडणार नाही?

कौशल्य शिक्षणाचा पर्याय सरकारला अलीकडे अतिशय आकर्षक वाटतो आहे आणि अनेकांचा त्याला पाठिंबा आहे. जणू तो साऱ्या शिक्षणविषयक प्रश्नांवर रामबाण उपाय आहे. पण योग्य कौशल्य असणाऱ्या लोकांमध्येसुद्धा बेकारी आहे हे उघड आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा असल्याने व्यावसायिक यशालाही बऱ्याच मर्यादा पडतात. भारत सरकारच्या ‘स्किल इंडिया’ योजनेची याबाबतची आकडेवारी काय सांगते हे पाहण्यासारखं आहे. ‘स्किल इंडिया’ योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये साडेतीन लाख जणांना उत्साहाने कौशल्य शिक्षण देण्यात आले. एका वर्षांत ही संख्या चौपटीहून अधिक वाढून सोळा लाख झाली. हे चांगलं झालं. पण किती मुलांना नोकऱ्या मिळाल्या? प्रशिक्षणानंतर रोजगाराचे प्रमाण ५० टक्कय़ांवरून तीस टक्कय़ांवर आल्याचे समोर येते आहे. खुद्द सरकारनेच मार्च २०१८ मध्ये राज्यसभेत दिलेली माहिती तसं सांगते. या योजनेअंतर्गत एकूण सुमारे ४१ लाख मुला-मुलींना प्रशिक्षण दिलं गेलं. परंतु त्यांपैकी फक्त सुमारे ६ लाख जणांना म्हणजेच पंधरा टक्कय़ांना उत्पादक उपयोगी रोजगार मिळाला. रोजगार म्हणण्याचं कारण असं की धंदा-व्यवसाय थाटण्यासाठी लागणारं भांडवल प्रत्येकाकडे नसतं. त्याला नोकरी शोधावी लागते. या अनेक गोष्टींमुळे कौशल्य शिक्षणाला मर्यादा आजच्या परिस्थितीत तरी बऱ्याच आहेत. कौशल्य शिक्षण हे आकर्षक पण वास्तवाला धरून दिलेलं उत्तर नाही. अर्थात हा एक शिक्षणबाह्य़ आणि अर्थशास्त्रीय विषय आहे. त्याची इथं व्यापक चर्चा होऊ  शकत नाही.

पर्यायी पद्धती

अनुत्तीर्ण हा शिक्का काढून टाकणं हे यावर अंतिम उत्तर नाही हे यावरून स्पष्ट होईल. एका चांगल्या बदलाची ही सुरुवात असेल कदाचित. केवळ स्मरणशक्तीच्या पलीकडे जाणाऱ्या मूल्यमापनाच्या विविध पद्धती जगभर विकसित झाल्या आहेत. प्रत्येक मुलाची वेगळी परीक्षा घेतली जाते ते ठीकच म्हणावं लागेल. पण ती फक्त स्मरणशक्तीची नको. स्मरणशक्तीवर अतिरिक्त ताण न देता देखील वैयक्तिक मूल्यांकन चांगलं करता येतं. प्रज्ञा मापनाच्या क्षेत्रात आज अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. काही देशांमध्ये ते चांगले रुजलेले देखील आहेत. बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसते हेही सिद्ध झालं आहे. भावना, संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी, कला यांच्याशी संबंधित अनेक प्रज्ञा असतात आणि त्या विकसित करून आत्मसात करता येतात. त्यांचं मूल्यमापन करण्याच्या विविध पद्धती आहेत. अर्थात मुलांची संख्या, शिक्षकांची संख्या, खोल्या, अवकाश, उसंत, सोयी सवलती, साहित्य सामग्री यांची समीकरणे सोडवायला हवीत. खर तर संख्या आणि गरिबी ही कारणं आता कोणीही, अगदी मायबाप सरकारने तर मुळीच सांगू नयेत. मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे. कोणत्या कामावर अधिक खर्च करायचा, कोणत्या कामावर कमी करायचा याचा विचार सरकारने आणि आपणही अगत्याने करायला हवा.

दुसरी गोष्ट अशी की खरं तर प्रत्यक्ष जीवनात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण बहुतेकदा एकत्र येऊन, एकमेकांना विचारून, कोणाची तरी मदत, सल्ला घेऊन शोधत असतो. मूल्यांकनाच्या अशा समूहपद्धती देखील आहेत. अर्थात कॉपी करणं ही रूढ समूहपद्धत योग्य नाही. हे सांगणे न लगे! किंबहुना कुणाचीही कसलीही कॉपी न करता मुलांना सहकार्य, आधार, सहिष्णुता, विचार, चौकस वृत्ती, संवाद, सर्जनशीलता, संवेदनशीलता इत्यादींचा शोध आणि कस या पद्धतीत नव्याने लागतो, असा अनुभव आहे. मुलं अशा परीक्षेची आतुरतेनं वाट पाहतात. पण ही एकच पद्धत नाही. अशा अनेक पद्धती आहेत की ज्यात दृष्टिकोन, ज्ञान, माहिती, प्रश्न आणि उत्तराचा शोध घेण्याची वृत्ती आणि प्रत्यक्ष कृती यांचा साकल्याने विचार करता येतो आणि शिक्षक वर्गाला देखील या पद्धतीने मूल्यमापन करायला खूप आवडतं. यात मुलं नापास होत नाहीत. मर्यादा अर्थात यातही आहेतच. पण स्मरण-परीक्षेला खूपच मर्यादा आहेत. त्या इथं नाहीत.

शिक्षण व्यवस्थेमधून निर्माण होणाऱ्या कोणत्याही एका समस्येवर आणि तिच्यावरील उत्तराचा विचार करायला सुरुवात केली की एका प्रश्नावर गाडी येऊन थांबते. तो म्हणजे शिक्षणाचा हेतू काय? जर शिक्षणाचा हेतू सर्वागीण क्षमता निर्माण करण्याचा असेल, शिक्षणातून प्रगल्भ माणूसपण घडवायचं असेल, मुलांमध्ये  वैज्ञानिक आणि मानुष रीतीसंकल्पना रुजवायच्या असतील तर, आणि हे सगळं देता देता मुलांना त्यांच्या पुढील जीवनासाठी खरोखरच तयार करण्याचा असेल तर केवळ कोणता शिक्का काढायचा आणि कोणता शेरा द्यायचा याच्या पुढं जाऊन वेगळा विचार करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here