करोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतालाही याची झळ बसली आहे

करोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतालाही याची झळ बसली आहे. सद्य:परिस्थिती पाहता आठवण होते ‘अंतराळातील भस्मासुर’ या कथासंग्रहातील  डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘अथेन्सचा प्लेग’ या कथेची. सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होणारी ही कथा.  करोनाच्या निमित्ताने वाचकांसाठी पुन: प्रकाशित करीत आहोत.

काळ्याकुट्ट अंधारातून ते आकाशयान संथपणे वाटचाल करीत होते. नाही म्हणायला आकाशात तारे होते. पण त्यांचा प्रकाश तो किती असणार? एका बाजूला सूर्य चकाकत होता. पण पृथ्वीवरून पाहणाऱ्याला दिसणारे निळे आकाश इथे नव्हते- कारण सूर्याचा प्रकाश इतस्तत: पसरवून आकाशाला निळा रंग फासणाऱ्या वायुमंडलाचा इथे अभाव होता. त्यामुळे सूर्यसुद्धा केविलवाणा दिसत होता.

यानाच्या बाहेर शांतता होती तशी आतही होती. यानात चालक धरून तीन यात्री होते. दोघे जण जागे आणि तिसरा झोपलेला. प्रत्येक जण पाळीपाळीने आठ तास झोपायचा. जागे असलेल्यांना झोपलेल्याचा हेवा वाटायचा. कारण जागेपणी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना सारखा भेडसावयाचा.

‘‘जन्मठेप पत्करली अशा प्रवासापेक्षा!’’ चालक राजन उद्गारला.

‘‘तुला चालक म्हणून थोडे तरी काम आहे! मला तेवढेही सुख नाही.’’ अब्दुल म्हणाला.[quads id=1]

‘‘कसले आलेय काम? तुला माहीत आहे हे सगळे यान स्वयंचलित आहे. मला सगळ्या यंत्रांकडे नुसते बघत राहायचे काम आहे. कधी कधी वाटते, की ही यंत्रे आपल्याला हिप्नोटाईझ करतील त्यांच्याकडे सारखे पाहात राहिले तर.’’

‘‘माझे तर मत आहे की, अशा अंतराळ प्रवासावर माणसे पाठवूच नयेत. यंत्रेच सर्व कामे करतील. माणसांनी धाडस दाखवून, कर्तबगारीची कामे करण्याचे दिवस आता राहिले नाहीत राजन.’’

‘‘कबूल! दोनशे वर्षांपूर्वीच ते दिवस संपत आल्याची चिन्हे दिसत होती.’’ राजन म्हणाला.  ‘‘पण कदाचित या प्रवासात आपल्याला मोका मिळेलही.’’

अब्दुलने जांभई देत विचारले, ‘‘आता आपण धूमकेतूच्या कक्षेत आलो का?’’

‘‘अजून अवकाश आहे. आणखी एकशे पाच मिनिटांनी आपले यान त्या कक्षेत प्रवेश करील. मग तुला थोडे काम आहे.’’

‘‘होय, मोठेच काम! त्या कक्षेत धूमकेतूने सोडलेल्या पदार्थाचे नमुने गोळा करण्याचे – आणि तेसुद्धा यंत्राच्या मदतीने.’’ अब्दुल म्हणाला.

‘‘पण तुला त्यानिमित्ताने यानाबाहेर जायला मिळणार आहे.’’ राजनच्या शब्दात हेवा होता.

‘‘अंधारकोठडीतल्या कैद्याला अधूनमधून शुद्ध मोकळी हवा देण्यासाठी साखळ्या घालून हिंडवण्यात येते. फक्त इथे बाहेर अंधार आणि हवाच नाही! तरी या लहान जागेतून जायला मिळते हेही काही कमी नाही.’’

ती एकशे पाच मिनिटे अब्दुलला युगाप्रमाणे वाटली. दीड महिन्याच्या अंतराळ प्रवासातला परमोच्च बिंदू आता येणार होता. पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका नव्या धूमकेतूच्या कॉमेट रोजच्या कक्षेत जाऊन कॉमेटमधून बाहेर पडलेल्या पदार्थाचा सखोल अभ्यास करायची ही योजना होती. त्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी योजलेले अनेक प्रयोग त्या यानात होते; आणि त्या प्रयोगांना आता सुरुवात होणार होती.

अब्दुलजवळचा लाल दिवा बदलून पिवळा झाला. बाहेर पडण्यासाठी तयारी करायला ही पूर्वसूचना होती. आणि कदाचित अनवधानाने रंग बदललेला कळला नाही तर दुसरी उपाययोजनाही कार्यान्वित झाली. अब्दुलच्या कानांजवळ मंद, पण स्पष्ट स्वरात ‘बीऽऽप – बीऽऽप..’ असे आवाज येऊ लागले.

पण अब्दुलला याची गरजच नव्हती. याच क्षणाची तो इतके दिवस वाट पाहत होता. तो ताडकन् उभा राहिला आणि त्याने स्पेससूट चढवायला सुरुवात केली..

हिरवा दिवा लागेपर्यंत अब्दुल तयार होता. हातात काही उपकरणे घेऊन त्याने यानाचे दार उघडले आणि बाहेर पाऊल टाकले.

जरी तो मोकळ्या अंतराळात तरंगत असला तरी एका लांब केबलने तो यानाशी जोडला गेला होता. काही अनपेक्षित घडले तर त्याचा यानाशी संबंध सुटू नये म्हणून. शिवाय त्याच्या तोंडाशीच असलेला मायक्रोफोन राजनशी संपर्क साधून होताच.

यानातल्या एका टी.व्ही. स्क्रीनवर राजनला अब्दुलच्या सर्व हालचाली दिसत होत्या. त्याचा श्वासोच्छ्वास, त्याच्या हृदयाचे आणि नाडीचे ठोके राजनला स्पष्ट ऐकू येत होते. राजनच्या आसपास यंत्रांच्या जाळ्यात अब्दुलच्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली बिनचूक पकडल्या आणि टिपल्या जात होत्या. फक्त मनातले विचार ओळखायची शक्ती अजून विज्ञानाने त्या यंत्रांना पुरवली नव्हती..

या सर्व ‘रुटीन प्रिकॉशन्स’ होत्या – अब्दुलच्या संरक्षणासाठी बाविसाव्या शतकाच्या आरंभापासून त्या अशा सर्व मानवचलित आकाशयानात वापरल्या जात- विशेषकरून जर एखादा अंतराळवीर यानाबाहेर जाण्याची शक्यता असेल तर. अंतराळ बहुतकरून मोकळे असल्याने धोक्याची शक्यता कमीच होती.

तरी काही अनपेक्षित घडले तर त्यासाठी ही उपाययोजना होती. अब्दुलने ठरल्याप्रमाणे यांत्रिक उपकरणे अंतराळात ठेवली आणि आसपास फिरायला सुरुवात केली..

राजन घडय़ाळावर लक्ष ठेवून होता. बरोबर अर्धा तास झाल्यावर अब्दुलने परत यायला सुरुवात करायची होती.

दहा मिनिटे झाली. पंधरा.. वीस.. पंचवीस मिनिटे होत आली आणि राजनला धोक्याची पहिली सूचना मिळाली. अब्दुल किंचित चक्कर आल्यासारखा चालत होता.[quads id=2]

राजनने जवळच्या यंत्रांच्या पॅनलकडे पाहिले. हृदयाचे आणि नाडीचे ठोके भरभर पडत होते, ब्लडप्रेशर वाढत होते.. एकाच मिनिटात अब्दुल दारू पिऊन झिंगल्यासारखा चालतोय असे राजनला वाटले.

‘‘अब्दुल! अब्दुल! काय झाले? काही तरी बोल.’’ राजन उद्गारला आणि त्याने त्याच वेळी विल्सनला उठवायला त्याच्या डोक्याजवळची घंटा वाजवली.

‘‘मला मळमळतंय.. चक्कर येते.. आ – आ..’’ अब्दुलला बोलायला त्रास होत होता.

विल्सन उठून आला होता. त्याला काही सांगायची जरूर नव्हती. त्याने धोका ओळखून अब्दुलला जोडलेली केबल ओढायला सुरुवात केली. झोकांडय़ा खात अब्दुल यानाकडे खेचला जात होता.

यानाचे दार उघडून अब्दुलला आत घेतले तेव्हा राजनने घडय़ाळाकडे पाहिले. अब्दुल बाहेर पडून तीस मिनिटे झाली होती. शेवटच्या पाच मिनटांत हे सर्व रामायण घडले होते.

राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क साधला.

‘अंतराळातला भीषण अपघात’, ‘अंतराळवीराचा गूढ परिस्थितीत मृत्यू’, ‘अंतराळ यात्रेकरू अज्ञात रोगाचा बळी..’

वरील प्रकारच्या मथळ्यांच्या बातम्या ऐकून पृथ्वीवरील रहिवासी हतबुद्ध झाले. गेली कित्येक दशके अंतराळात अपघात घडला नव्हता. रस्ता ओलांडताना आपण जो धोका पत्करतो त्याहून कमी धोका अंतराळ यात्रेत असतो असा तंत्रज्ञांचा दावा होता; आणि त्यात तथ्य आहे हे अनेक वर्षांच्या अनुभवांती दिसून आले होते. मग हा अपघात कसा झाला? आणि अब्दुलला झालेला अज्ञात रोग कसला होता? वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे विसाव्या शतकापर्यंत पृथ्वीला भेडसावणाऱ्या अनेक रोगांचे संपूर्ण उच्चाटन झाले होते. त्यामुळे रोगराई म्हणजे काय हेच पृथ्वीकर विसरले होते.

आणि सामान्य माणसाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यताच नव्हती. कारण सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर अंतराळ संस्थेने या बाबतीत मौन पाळले. ’‘जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही सांगू इच्छित नाही! मात्र, या प्रकारामुळे सर्वसामान्य पृथ्वीकरांना काळजी करायचे कारण नाही’’ – त्या संस्थेचा एक प्रवक्ता म्हणाला.

परंतु अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांमध्ये काळजीचे वातावरण होते. अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची एक समिती नेमण्यात आली आणि तिच्यावर अब्दुलच्या मृत्यूचे रहस्य उकलण्याचे काम सोपवण्यात आले. या समितीच्या तातडीने बोलावलेल्या परिषदेत डॉक्टर जॉन्सन आपला पहिला रिपोर्ट देत होते :

‘‘५ डिसेंबर २१८० या दिवशी हा अपघात झाला. अंतराळ यान उर -2 हे कॉमेट रोजच्या कक्षेत बरोबर ०९-३०-११.५७ या वेळी शिरले. त्यानंतर काही वेळाने – रेकॉर्डप्रमाणे ०९-४१-२२.०५ वेळी- अब्दुल यानातून बाहेर पडला. कॉमेट रोजच्या शेपटीतून निघालेल्या पदार्थाचे विश्लेषण करणारी उपकरणे त्याने योग्य ठिकाणी लावली.’’

‘‘कॉम्प्युटरवर नोंद आहे. त्यानुसार १०-०३-३९.३२ वाजेपर्यंत अब्दुलच्या शरीराच्या हालचाली व्यवस्थित चालू होत्या. त्यानंतर त्यात झपाटय़ाने बदल होत गेले. त्या सर्व नोंदी तुमच्यापुढे ठेवल्या आहेत.’’

‘‘१०-०७-४०.०० वाजता राजनने अब्दुलला आत खेचायचा निर्णय घेतला. विल्सनने ताबडतोब अब्दुलला आत ओढले आणि आयसोलेशन चेंबरमध्ये ठेवले. हा भाग नेहमी वापरात नसतो- केवळ अशा संकटकालीन परिस्थितीत वापरला जातो. उर-2 वर हा भाग पूर्वी कधीच वापरला नव्हता, पण तेथील सर्व यंत्रसामग्री नेहमी अद्ययावत परिस्थितीत ठेवली जाते. विल्सन आणि राजन यांनी अब्दुलला तेथे ठेवून त्याला शक्य तेवढी मदत केली.’’

‘‘दरम्यान, राजनने मिशन कंट्रोलशी संपर्क  साधून परिस्थितीची सूचना दिली होती. सर्वात जवळच्या स्पेस स्टेशन नं. १६ मधून एक यान सर्व प्रकारची वैद्यकीय सामग्री घेऊन निघाले आणि अब्दुलला घेऊन आले. अब्दुलवर सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले. पण डॉक्टरांना यश आले नाही. १३ डिसेंबरला त्याचे निधन झाले.’’

‘‘अब्दुल जिवंत असताना आणि तो मेल्यावरदेखील त्याच्या शरीरावर ज्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावरून तज्ज्ञांना इतकेच सांगता आले की एका, आजवर परिचित नसलेल्या रोगाच्या व्हायरसचा इथे संबंध आहे. पूर्वीचे रेकॉर्ड्स पाहून कॉलरा, देवी, पिवळा ताप इत्यादी अनेक रोगांची माहिती पडताळून पाहून असे म्हणावेसे वाटते की, हा असा रोग पूर्वी पृथ्वीवर नव्हता आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला तो अज्ञात आहे. रोगाची लक्षणे आणि त्यात कालानुसार होणारे बदल यांचा सर्व रिपोर्ट तुमच्यापुढे आहे.’’

समितीच्या सभासदांनी आपल्या पुढच्या टी.व्ही. सेट्सकडे पाहिले. प्रत्येक सभासदासमोर टी.व्ही. सेट असून काही ठरावीक बटणे दाबून त्याला आवश्यक ती माहिती पडद्यावर आणता येत होती. काही काळ सर्वत्र स्तब्धता होती आणि प्रत्येक सभासद रोगावरील रिपोर्ट वाचण्यात दंग होता. सर्वच सभासद डॉक्टर नव्हते. काही अंतराळशास्त्रज्ञ, काही जीवशास्त्रज्ञ, काही खगोलशास्त्रज्ञ तर काही निष्णात डॉक्टर होते.

डॉक्टर विनोद हा अशा शेवटच्या ग्रुपपैकी होता. जरी पृथ्वीवर रोगराई जवळजवळ नाहीशी झाली होती तरी जीवशास्त्राबद्दल अधिक माहिती मिळावी या हेतूने ‘रोग’ या विषयाचे काही तज्ज्ञ अध्ययन करीत. अशा तज्ज्ञांत विनोदला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे हा रिपोर्ट वाचून त्याचे काय मत होते याबद्दल अनेकांना उत्सुकता होती.

विनोद रिपोर्टमधील महत्त्वाची बातमी डोक्यात साठवत होता. प्रथम मळमळणे, डोकेदुखी, घसा आणि जीभ लालभडक होणे, श्वास अनियमित आणि दुर्गंधीने भरलेला, त्यानंतर शिंका, खोकला छातीपर्यंत पोहोचलेला, त्यातून ओकारी येणे. पुढे कन्व्हलशन्स. काही वेळ आराम वाटतो. मग पुन्हा दुखण्याचा वाढता जोर. एकंदर शरीर किंचित उष्ण होते, लालसर होते, फोड आणि रॅश येऊ लागतात. पण रोग्याला आतून विलक्षण अस्वस्थता वाटते. सर्व शरीर तापल्याचा भास होतो. अंगावर कपडे नकोत असे वाटते. थंड पाण्यात शिरून तिथे पडून राहावेसे वाटते. अतिशय तहान लागते आणि कितीही पाणी पिऊन भागत नाही. झोप उडून जाते. त्यातून पुढे डायरिया आणि वाढती अशक्तता आणि शेवटी- शेवट.

डॉक्टर जॉन्सनचे निदान प्रथमदर्शनी तरी बरोबर होते. ही लक्षणे कुठल्याच एका साच्यात बसत नव्हती. जरी अब्दुलला आयसोलेशन युनिटमध्ये ठेवले होते तरी त्यापूर्वी त्याचा आणि राजन आणि विल्सनचा संपर्क आला होता. पण त्या दोघांना काही झाले नाही. त्या अर्थी हा रोग संसर्गजन्य नसावा का?

‘‘काय विनोद! तुझे काय मत आहे?’’ – खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट ली उद्गारला, ‘‘सर्व रोगांची माहिती डिक्शनरीप्रमाणे तुझ्या डोक्यात साठवलेली असते.’’

‘‘मला अजून निदान होत नाही. पण सर्व चाचण्या तपासून मगच सांगू शकेन.’’ विनोद.

‘‘पण या रोगाचे मूळ त्या कॉमेट रोजमधून निघालेल्या वस्तूंतच असावे.

निदान परिस्थितीजन्य पुरावाच तसा आहे.’’ रॉबर्ट ली म्हणाला.

‘‘त्या दृष्टीने आपण आणखी प्रयोग करू शकू . जर या समितीची तशी इच्छा असेल तर. अर्थात हे प्रयोग माणसांवर न करता काही प्राण्यांवर करता येतील.’’ जीवशास्त्रज्ञ फॅरेल्ली म्हणाले.

या मुद्दय़ावर समितीत बरीच चर्चा झाली. जनावरांवर प्रयोग करणे क्रूरपणाचे आहे, असे काहींचे मत पडले, तर जनावरांवरील परिणाम माणसांना कितपत लागू पडतील याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. अखेर विनोदने मांडलेला मुद्दा सर्वाना महत्त्वाचा वाटला : ‘‘जर समजा, हा रोग पृथ्वीवर पसरला तर त्यावर निदान करायला आपल्याला साधने हवीत आणि म्हणून या रोगाबद्दल मिळेल तितकी माहिती गोळा करणे अत्यावश्यक आहे.’’

कॉमेट रोजच्या कक्षेत आणखी एक अंतराळ यान पाठवून जनावरांवर प्रयोग करायचा निर्णय समितीने घेतला आणि सभा बरखास्त झाली.

त्यानंतरच्या सहा महिन्यांत नवीन रोगाबद्दल बरीच माहिती मिळाली. कॉमेट रोजशी त्याचा संबंध होता हे निश्चित झाले. अंतराळातून जाताना धूमकेतू जे काही पदार्थ मागे सोडत जातो त्यामध्ये या रोगाचा व्हायरस होता हे निश्चित झाले. पृथ्वीबाहेर एका लांबच्या ठिकाणी या व्हायरसचा जन्म झाला असणार आणि हा जीवसृष्टीचा एक निकृष्ट नमुना समजला- निदान जीवसृष्टीबद्दलचा सबळ पुरावा समजला- तर त्यावरून पृथ्वीपलीकडे लांबवर जीवसृष्टी असण्याची शक्यता दिसून येत होती.

‘‘बरं झालं या रोगाचा संबंध कॉमेटशी लागला ते.’’ फॅरेल्ली म्हणाला.

फॅरेल्ली आणि विनोद इटालियन आल्प्सवर हायकिंग करत होते.

‘‘काय म्हणून?’’

‘‘म्हणजे काय? कारण स्पष्ट आहे. एक तर हा रोग कॉमेटमुळे झाला आणि तो कॉमेटबरोबर लांब निघून गेला. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. पृथ्वीवासीयांचा धोका टळला. दुसरी गोष्ट म्हणजे, जरी दुर्दैवाने अब्दुलला आपला जीव गमवावा लागला तरी त्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही. पृथ्वीपलीकडे लांबवर जीवसृष्टी असेल याचा इतका सबळ पुरावा आजवर सापडला नव्हता.’’

‘‘दुसऱ्या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे, पण पहिल्या बाबतीत नाही. कशावरून हा रोग कायमचा दूर गेला आणि जर हा रोग कॉमेटपासूनच आला असे म्हटले तर त्याचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम काय म्हणून व्हावा?’’ विनोद.

‘‘म्हणजे? मी समजलो नाही!’’

‘‘हे बघ फॅरेल्ली! रोग म्हणजे काय? जर एखाद्या बाहेरच्या व्हायरसचा आपल्या शरीराशी मुकाबला झाला तर तो व्हायरस आपल्या शरीरातील पेशीवर हल्ला करतो. आजवर पृथ्वीवर तयार झालेल्या व्हायरससंबंधी आपण असे म्हणत आलो की, अमुक एक व्हायरस काही ठरावीक पेशींवरच हल्ला करतो. याचा अर्थ आपला शत्रू म्हणूनदेखील व्हायरस आणि पेशींची ओळख पटायला पाहिजे. असे जर असेल तर या कॉमेटमधून आलेल्या व्हायरसला अब्दुलच्या शरीरातील पेशीची ओळख पटली कशी?’’

‘‘आता मला तुझी अडचण समजली. ज्याचा माझ्याशी कधी संबंध आला नाही अशा माणसाने जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून येऊन माझ्यावर हल्ला करावा त्यापेक्षाही ही घटना असंभाव्य वाटते खरी.’’ फॅरेल्ली उद्गारला. ‘‘मात्र, ही असंभाव्यता कमी करायची असली तर आपण असे म्हणू शकू, की हा रोग पूर्वी पृथ्वीवर थैमान घालून गेला असेल. त्यामुळे मानवी पेशींना त्या व्हायरसची ओळख असेल.’’

‘‘मी तोच विचार करतोय; पण हा रोग पृथ्वीवर पूर्वी केव्हाही आल्याचे मला सापडत नाही. मी गेल्या तीनशे-चारशे वर्षांचे वैद्यकीय दाखले पाहिले. आपल्या कॉम्प्युटरमध्ये त्या काळच्या सर्व रोगांची लक्षणे स्पष्ट दिली आहेत; परंतु या रोगाची ओळख पटत नाही.’’

‘‘पण विनोद, तू फक्त गेल्या तीनशे-चारशे वर्षांपर्यंतच का हे संशोधन मर्यादित ठेवलेस? त्यापूर्वी रोग नव्हते का? मध्ययुगात युरोपमध्ये रोगाने थैमान घातले होते..’’

‘‘कबूल, पण त्या काळी वैद्यकशास्त्र प्रगत आधुनिक अवस्थेत नव्हते. शिवाय आपल्याला पाहिजेत तसे दाखलेही सापडत नाहीत.’’ विनोदची अडचण रास्त होती.

‘‘तरीपण तू प्रयत्न करून पाहा. जरी वैद्यकीय माहिती उपलब्ध नसेल तरी जुनी वाङ्मयीन पुस्तके पाहा, कुठे तरी तुला सापडेल असे मला वाटते. नाही तर या लांबच्या रोगाचा पृथ्वीशी संबंध असणे फारच असंभाव्य वाटते.’’ फॅरेल्ली म्हणाला.

हायकिंगवरून परतल्यावर विनोदने नव्या जोमाने शोध सुरू केला. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचे वेगवेगळ्या काळांतले साहित्य सर्व एका मोठय़ा कॉम्प्युटरच्या स्मरणशक्तीत साठवले होते; परंतु या माहितीच्या साठय़ातून आपल्याला नेमकी उपयोगी वाटणारी माहिती शोधून काढणे सोपे नव्हते. त्यासाठीदेखील विनोदला कॉम्प्युटरचीच मदत घ्यावी लागली. तरीदेखील गवताच्या ढिगाऱ्यात हरवलेली सुई शोधण्यासारखे हे काम होते किंवा त्याहीपेक्षा अवघड! कारण सुई शोधणाऱ्याला सुई कशी दिसते हे माहीत तरी असते. विनोदला नेमके काय हवे तेच माहीत नव्हते. अब्दुलला झालेल्या रोगाचे वर्णन जगातील अनेक संस्कृतींच्या अनेक भाषांतून कुठे तरी दडलेले त्याला पाहिजे होते..

अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर कॉम्प्युटरमधून संदेश आला : ‘पुढे दिलेले अवतरण पाहा.’ आणि टी.व्ही. स्क्रीनवर शब्द उमटू लागले. विनोद प्रथम निष्काळजीपणे पाहात होता. अशी अनेक अवतरणे त्याने पाहून नापास केली होती, पण या वेळी प्रकार वेगळा होता. जसजसा विनोद वाचत गेला तसतशी त्याची उत्सुकता वाढत गेली.

‘‘सर्वाच्या मते, त्या सुमाराला इतर कुठलेही रोग नव्हते आणि जर कोणाला काही दुसरा आजार असला तरी त्याचे रूपांतर याच रोगात होई. जे धडधाकट होते तेसुद्धा एका क्षणात आणि काही कारण नसता प्रथम भयंकर डोकेदुखीने बेजार होत. त्यांचे डोळे लाल होत आणि दुखत. आतून घसा आणि जीभ लाल होई व श्वास अनियमित आणि दुर्गंधीयुक्त. शिंका आणि घसा बसणे आणि लवकरच छातीपर्यंत खोकला आणि रोग हृदयापर्यंत पोचला की त्यात बिघाड सुरू होई. ओकारीचे अनेक प्रकार.. ज्यांना डॉक्टरांनी वेगवेगळी नावे दिलीत, ते दिसून आले आणि त्यामुळे रोग्यांना विलक्षण त्रास होई.. कन्व्हलशन्सचा त्रास.. शरीर बाहेरून फार गरम नसले तरी आतून उष्णता वाढे आणि त्यामुळे फोड आणि रॅश येई.. रोग्यांना हलकेफुलके कपडेसुद्धा अंगावर घालवत नव्हते. आपल्याला उघडेबंब ठेवा, असे ते सांगत आणि त्यांची सर्वात तीव्र इच्छा होती ती थंड पाण्यात स्वत:ला भिरकावून देण्याची. काही रोगी- ज्यांच्यावर लक्ष ठेवणारे कोणी नव्हते, अशांनी स्वत:ला पाण्याच्या हौदात डुंबून ठेवले. त्यांना न थांबणारी तहान लागे व कितीही पाणी प्यायले तरी तिच्यावर परिणाम होत नसे. त्यांना आराम करता येत नव्हता आणि झोप लागत नसे.. बहुतेक लोक आजाराच्या सुरुवातीपासून सातव्या ते नवव्या दिवसात मरण पावत.. काहींना डायरियाचा त्रास होई.. रोगाचे वर्णन करायला शब्द पुरे पडत नाहीत आणि रोगाचा जोर इतका होता की, दुखणे सहन करणे मानवी शक्तीच्या पलीकडले होते आणि एका बाबतीत हा रोग इतर रोगांपेक्षा वेगळा होता. जरी सर्वत्र रोगाने मेलेल्यांची शरीरे उघडय़ावर पडली होती, तरी नेहमी मानवी प्रेतांवर ताव मारणारी जनावरे आणि पक्षी त्यांच्याकडे फिरकत नसत किंवा चुकून जर त्यांनी त्या प्रेतांचे मांस भक्षण केले तर त्यांचाही अंत होई..’’

या वर्णनाचे डॉक्टर जॉन्सन यांनी केलेल्या रिपोर्टशी इतके साम्य होते की, आपण तोच रिपोर्ट परत वाचत आहोत असे विनोदला वाटले. कोण होता हा लेखक? केव्हाचे हे वर्णन होते? विनोदने कॉम्प्युटरकडून माहिती मागवली आणि ती लगेच मिळाली.

‘पेलोपोनेशियन युद्ध’ या ग्रंथात थूसिडाइड्स या ग्रीक लेखकाने केलेले हे वर्णन होते. ख्रिस्तपूर्वी ४३० वर्षे या साली. उन्हाळ्यात अ‍ॅथेन्स शहरात एका भयानक रोगाची साथ येऊन गेली त्याचे इत्थंभूत वर्णन या ग्रंथात सापडते. इतिहासकार म्हणून थूसिडाइड्सची ख्याती आहे. संपूर्ण दाखल्याशिवाय तो विधाने करत नसे आणि म्हणून अनेकदा एखाद्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन करायला त्याला दाखले मिळेपर्यंत बराच वेळ थांबावे लागे..

विनोदच्या डोक्यात प्रकाश पडला. आपल्या वाचनात ‘अ‍ॅथेन्सचा प्लेग’ या रोगाचे नाव आल्याचे त्याला आठवले; परंतु केवळ ऐतिहासिक घटना म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. आता तो त्याबद्दल मिळेल ती माहिती गोळा करायच्या मार्गावर लागला. गेल्या दोनशे-तीनशे वर्षांत अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञांनी अथेन्सचा प्लेग म्हणजे कोणता आधुनिक रोग असावा याबद्दल तर्क केले होते; परंतु कुठल्याही परिचित रोगाशी त्याचे साम्य दिसून आले नव्हते. तसेच हा रोग पुन्हा कुठे आला नाही याचे कारण काय असावे?  एक अपवाद सोडल्यास शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे उत्तर सापडले नव्हते. तो अपवादही विनोदला कॉम्प्युटरने शोधून दिला.

१९७५-८० च्या काळात फ्रेड हॉयेल आणि चंद्रा विक्रमसिंह या दोघा शास्त्रज्ञांनी असा तर्क केला होता की, हा रोग अंतराळात अवतरला असून त्याचे व्हायरस एखाद्या कॉमेटपासून निघून पृथ्वीच्या वायुमंडळातून खाली आले. त्यांचा वर्षांव अ‍ॅथेन्सच्या परिसरात झाला असणार. पुढे थोडय़ाच काळात त्या रोगजंतूंचाही अंत झाला. पृथ्वीवर येणारे अनेक रोग अशाच प्रकारे कॉमेटपासून उद्भवत असावेत आणि त्यांच्या रोगजंतूंपैकी ज्यांचे साठे पृथ्वीवर अवतरल्यापासून अनेक काळ टिकून राहिले तेच रोग पृथ्वीवर बोकाळले.

बहुतेक शास्त्रज्ञांनी ही कल्पना फारच अवास्तव म्हणून फेटाळून लावली होती. खुद्द या कल्पनेच्या जनकांना रोगांचा संबंध प्रत्यक्षपणे धूमकेतूंशी लावता आला नव्हता, जरी अप्रत्यक्ष स्वरूपाचे अनेक पुरावे त्यांनी नजरेस आणले होते.

पण आता विनोदला प्रत्यक्ष पुरावा सापडला होता. ज्या रोगाने अब्दुलचा जीव घेतला तोच रोग ‘अ‍ॅथेन्सचा प्लेग’ असे गृहीत धरले तर त्या रोगाचा व्हायरस कॉमेट रोजमधून निघाला हे आता सिद्ध झाले होते.

फक्त पुराव्याची साखळी पूर्ण करायला एका माहितीची आवश्यकता होती. विनोदने रॉबर्ट लीशी संपर्कसाधला.

‘‘बॉब, मी विनोद बोलतोय. मला एक माहिती पाहिजे.’’

‘‘हॅलो विनोद! तुला माहिती पाहिजे? आणि माझ्याकडून? म्हणजे उलटाच प्रकार झाला. तुझ्या कॉम्प्युटरमध्ये ती माहिती नाही?’’

‘‘ती अगदी नव्या स्वरूपाची असल्याने कदाचित त्यात नसावी. मला कॉमेट रोजला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला किती वेळ लागतो ते पाहिजे आहे. पूर्वी हा कॉमेट पृथ्वीजवळ केव्हा आला होता याची नोंद आहे का?’’

‘‘तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण या धूमकेतूची सूर्यप्रदक्षिणेची वेळ भलती लांब आहे. अजून अगदी बरोबर सांगता येत नाही, पण सुमारे ८५० ते ९०० वर्षे आणि पूर्वी खगोलशास्त्राच्या नोंदी उपलब्ध नसल्याने हा धूमकेतू गेल्या वेळी आल्याची नोंद नाही. तुला हीच माहिती पाहिजे होती का? कशाला?’’ लीने विचारले.

‘‘कारण नंतर सांगेन, पण तू माझा मोठा प्रश्न सोडवलास.’’ विनोदने मनातल्या मनात गणित करत म्हटले.

विनोदचे गणित सोपे होते. जर कॉमेट रोज ख्रिस्तपूर्व ४३० साली पृथ्वीजवळ आला असेल तर तेव्हापासून २१८० पर्यंत २६१० वर्षे झाली. तेवढय़ा वेळात जर धूमकेतने तीन चकरा मारल्या असल्या तर एका प्रदक्षिणेला लागणारा वेळ झाला ८७० वर्षे. म्हणजे रॉबर्ट लीने दिलेल्या माहितीशी हे गणित जुळत होते.

अ‍ॅथेन्सचा प्लेग कॉमेट रोजपासूनच उद्भवला होता.

विनोदला एक मोठा प्रश्न सुटल्याचे समाधान वाटले. अब्दुलचा बळी घेणाऱ्या रोगाचा व्हायरस मानवी पेशींना अपरिचित नव्हता. हा रोग पूर्वी पृथ्वीवर आला होता. याच कॉमेट रोजने तो पूर्वी अ‍ॅथेन्स शहरावर लादला होता.

धूमकेतू कोटय़वधी वर्षे सूर्यमालेत चकरा मारतात. ख्रिस्तपूर्व ४३० साली कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला ती त्याची पहिली चक्कर नसणार. तो त्यापूर्वी शेकडो, हजारो वेळा चकरा मारून गेला असणार. काही चकरांतून तो पृथ्वीच्या इतक्या जवळून गेला असणार की त्यातून निघणारे पदार्थ पृथ्वीच्या वायुमंडलात शिरले. या रोगाचे व्हायरस असेच पृथ्वीवर आले. जीवशास्त्राच्या सिद्धान्ताप्रमाणे पृथ्वीवरील जीवांच्या पेशीत हळूहळू बदल होत असतात. ज्या परिसरात जीवांचे संवर्धन होत असते त्यांची माहिती जीवांच्या पेशीत साठवली जाते, त्यामुळे अनेक पिढय़ांनंतर काही पेशींत बदल घडून येतात. याच मार्गाने पृथ्वीवरील जीवपेशींना कॉमेट रोजमधून येणाऱ्या व्हायरसची माहिती मिळाली.

पृथ्वीच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, या रोगाचे जंतू एकदा रोगाची साथ येऊन गेल्यावर फार काळ पृथ्वीवर टिकून राहत नसावे. म्हणून अ‍ॅथेन्सच्या प्लेगनंतर हा रोग परत पृथ्वीवासीयांना सतावू शकला नाही. शिवाय जोपर्यंत कॉमेट रोज पृथ्वीजवळून जात नाही तोपर्यंत परत पृथ्वीला धोका नाही..

आणि इथे विनोद विचार करता करता एकदम थबकला.

यंदा कॉमेट रोज पृथ्वीजवळून गेला होता..

हॉयेल आणि विक्रमसिंहांनी गणित मांडून असे दाखवले होते, की कॉमेटपासून येणारा व्हायरस अनेक महिने वायुमंडलात टिकून हळूहळू पृथ्वीवर उतरतो. म्हणजे हा रोग आता केव्हाही पृथ्वीवर येईल.

त्याचा प्रतिकार करायला आपण सज्ज राहिले पाहिजे. विनोदने जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधला.

ज्या रोगाचा प्रतिकार करणे अ‍ॅथेन्सच्या संस्कृतीला जमले नाही ते आजच्या वैज्ञानिक संस्कृतीला जमेल का?

‘‘हा एक यक्षप्रश्नच आहे.’’ विनोद पुटपुटला.

अब्दुल जिवंत असताना आणि तो मेल्यावरदेखील त्याच्या शरीरावर ज्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावरून तज्ज्ञांना इतकेच सांगता आले की एका, आजवर परिचित नसलेल्या रोगाच्या व्हायरसचा इथे संबंध आहे. पूर्वीचे रेकॉर्ड्स पाहून कॉलरा, देवी, पिवळा ताप इत्यादी अनेक रोगांची माहिती पडताळून पाहून असे म्हणावेसे वाटते की, हा असा रोग पूर्वी पृथ्वीवर नव्हता आणि आधुनिक वैद्यकशास्त्राला तो अज्ञात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here