शिवाजी महाराजांचा छावा, धर्मवीर, स्वराज्यरक्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पंडित आणि अशी अनेक नामाबिरुदे मिरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आज जयंती आहे. अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेज झुंजवले. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजी राजे रणांगणावरचे शेर होते. स्वकीयांनी फितुरी केली नसती, तर संभाजी राजे केव्हाच कुणाच्या हाती लागले नसते. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची, त्यांची पद्धत गजब होती .

1762 च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी ऍबे कँरे संभाजी महाराांबद्दल लिहतो . “संभाजी महाराज …हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्ध कुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून तो मजबूत बांध्याचा आणि अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते…

वयाच्या १४ व्या वर्षी ग्रंथ लेखन

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी राजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसाद केल्या होत्या. संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली, असे सांगण्यात येते. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज होते.

छत्रपती राज्याभिषेक

१६ जानेवारी१६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

संभाजी महाराजांचे घोडदळ

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजही केवळ गडावर बसून आहे तो राज्यकारभार करण्यातले नव्हते. शिवाजी महाराजांसारखाच संभाजी राजेंनीही शत्रूविरोधात जोरदार लढा दिला. गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली होती. गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला होता की, पुन्हा पोर्तुगीज संभाजी राजेंच्या वाटेला गेला नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांकडेही जातिवंत आणि राजाप्रमाणेच शूरवीर घोडे होते.

संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमले होते.

अजेय योद्धा

छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले.

रणजीत तायडे
खामगांव .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here